बालकाव्यसंग्रहाचे परीक्षण




  

उत्तम साहित्य आणि निर्मिती मूल्य असलेला बालकाव्यसंग्रह
एकनाथ आव्हाड हे एक सुप्रसिध्द कवी, बालसाहित्यिक आहेत . आव्हाड सरांना लहान मुलांसाठी लिखाण करायला, त्यांना शिकवायला खूप आवडतं आणि म्हणून त्यांनी शिक्षणाचा वसा घेतला आहे आणि त्यांच्या या कामामुळे त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षकांसाठी असलेला मानाचा महापौर पुरस्कारही मिळालेला आहे आणि आता त्यांची बाल साहित्य संपदा, मुलांप्रती असलेली निष्ठा बघून आव्हाड सरांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांसाठी छान छान  पुस्तक तयार करण्यासाठी निवड झाली आहे.  तर अशा या आव्हाड सरांचे आतापर्यंत लहान मुलांसाठी  एकूण १०  पुस्तक आलेली आहेत. आणि नुकतेच अखिल भारतीय  सानेगुरुजी कथामाला, डोंबिवली शाखा प्रकाशन आव्हाड सरांचे  बच्चे कंपनीसाठी नव्याकोऱ्या कवितांचा 'तळ्यातला खेळ' हा बालकाव्यसंग्रह घेवून आपल्या भेटीस आले आहे.
पुस्तकातील सर्वच कविता ह्या विविध वयोगटातील वाचकांना भुरळ पडणाऱ्या आहेत.
'एकदाचा घरात संगणक आला
घराल्या साऱ्यांचा जोडीदार झाला
दारावर आमच्या आता पाटी नवी,
‘संगणक साक्षर’ आहोत आम्ही'
ही काळाची पावलं ओळखून केलेली  कविता वाचतांना घरातील प्रत्येकाला संगणकाचा होणारा उपयोग आपल्यालाही पटून जातो.
तर ‘खेळ खेळू या’  या कवितेत गावाकडे आजही कुठले कुठले खेळ खेळले जात आहेत  त्यांची नावं यांची छान गुंफण केली आहे 
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच खेळ खेळायला आवडत असतं लहान मुलं तर शाळेला सुट्टी कधी लागते आणि कधी आपण मनसोक्त खेळतो याची वाट बघत असतात आणि मग सुट्टी पडली की सुरु होतो दंगा,मस्ती,क्रिकेट,विटीदांडू, पोहणं आणि बरच काहीआता मुलं तर खेळ खेळतातच पण तुम्हांला  माहिती आहे का, की पशु, पक्षी सुद्धा निरनिराळे गमती जमतीचे खेळ खेळत असतात, आणि त्यांच्या पैकी बदकांचा मजेदार खेळ तुम्ही कधी बघितला आहे का कधी? 'तळ्यातला खेळ' ही  कविता बघा
'प्रत्येक पिल्लू तळ्यातल्या कमळासंगे खेळे,
नंतर मात्र आईमागे एका ओळीत पळे,
आई होते इंजिन जणू डब्बे होतात पिल्ले,
त्यांची गाडी तळ्यात अशी तुरु तुरु चाले’,
मुलं लहानपणी कशी आईच्याच अवती भवती फिरतात याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे ही  कविता होय.  आणि ती मुळ  कविता खूपच वाचनीय आहे. आव्हाड सर आपल्याला पशु-पक्षाच्या ह्या गमतीदार खेळाकडे आपलं लक्ष वेधून घेवून आपलं जीवन समृध्द करीत आहेत.  तर तळ्यातला खेळ या बालकाव्यसंग्रहामध्ये 'ताईगिरी' या कवितेत बहिण-भावाची मजेशीर भांडण आहेत  आणि त्यातूनच  भावाला उमगलेल्या ताईच्या  निस्सीम प्रेमाचं दर्शनही आहे.ह्या कवितेमुळे नक्कीच  वाचक बहिण-भावाचं नात मजबूत होण्यास मदत होईल.
तर चिन्हाचा खेळ ही कविता वाचून नक्कीच मुलांचे व्याकरण पक्के होईल. शिक्षक आणि कवी यांची छान सांगड घातली गेली आहे. तर ह्याच अनुभवातून समाजातील कितीतरी मुलांमध्ये,त्यांच्या पालकांमध्ये शिक्षणाविषयी अनास्था आहे ती दूर करण्यासाठी 'शाळेत चला जावूया...' नावाची लिहिलेली मार्मिक कविता आहे.
म्हणजे आव्हाड यांच्या कवितेत शब्दांचा खेळ आहे लहान मुलांमधील निरागसता, उत्सुकता आहे, एक संस्कार क्षमता आहे. तेव्हा या उत्तम साहित्य मूल्य असलेल्या या 'तळ्यातला खेळ' काव्यसंग्रहाचे बालक,पालक आणि शिक्षक आनंदाने स्वागत करतील ही खात्री आहे.कारण या काव्यसंग्रहाला 'आनंदाच्या तळ्यातला खेळ' अशी प्रस्तावना देतांना पद्मभूषण कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, “खाऊचा डबा पाहून मुलांना जसा आनंद होतो,तसा आनंद पुस्तक पाहून मुलांना झाला पाहिजे, असे एकनाथ आव्हाड यांना वाटते.
'असा माझा मित्र, सदासर्वकाळ हसरा,
पुस्तकासारखा खराखुरा, मित्र नाही दुसरा'
पुस्तकाला एकनाथ आव्हाड हसरा मित्र म्हणतात, ‘तळ्यातला खेळ' हा आनंद देणारा मित्र त्यांनी मुलांसाठी आणला आहे. या मित्राशी मुले  आनंदाने हसत नाचत खेळतील असा मला विश्वास वाटतो.”
संपूर्ण रंगीत असलेल्या या पुस्तकात स्वामी मुक्तानंद हायस्कूलच्या इयत्ता  सातवीच्या विद्यार्थ्यांनी समर्पक अशी चित्र काढली असून उत्कृष्ट साहित्य आणि निर्मिती मूल्य असलेल्या या बत्तीस पानी पुस्तकाची किंमतही अवघी वीस रुपये ठेवली आहे.आणि ही बाब नक्कीच दखलपात्र आहे.
‘तळ्यातला खेळ' (बालकाव्यसंग्रह)
कवी : एकनाथ आव्हाड
प्रकाशक : तानाजी सावंत
अखिल भारतीय  सानेगुरुजी कथामाला, डोंबिवली शाखा प्रकाशन
मो.: ९८७०४८६९४०
पृष्ठे : ३२, किंमत : रुपये २० फक्त
ज्योती कपिले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: