बाल कविता ...




१)"बंडूचा रेनकोट"
बंडू रुसून बसला, नव्या रेनकोटसाठी
हाताची घडी अन ओठांची गुप मिठी
रेनकोटला जुन्या पडली होती भोकं
पावसात बंडूच भिजलं होत डोकं
गाल फुगवून बसली स्वारी
काही केल्या बोलेना
टपटप
टपटप डोळ्यातला
पाऊस काही थांबेना!
बाबा बंडूला मग,हळूच गुदगुल्या करून हसवी
आईने काढली हळूच कपाटातून पिशवी
मिकी माऊसची चित्रे रेनकोटवर पाहिली
बंडोबाची कळी मग कशी पटकन खुलली
रेनकोट घालून बंडू तयार होऊन बसला
पण आता,पाऊसच आहे बंडूवर रुसला...

कवयित्री-ज्योती कपिले.
---------------------------------------
 

२)"मी कोण होणार?''
कधी मला वाटते मी "डॉक्टर" व्हावे
आजारी मुलाला गोड औषध देवून
पटकन बरे करावे!
कधी मला वाटते मी "पायलट" व्हावे
उंच उंच आभाळातून
चंद्र,चांदण्यांना घरी घेवून यावे.
कधी कधी मला वाटते मी "सैनिक"व्हावे
ठो ठो बंदुकीने शत्रूला मारावे
मातृभूमीचे रक्षण करावे! 
कधी वाटते हे तर कधी ते
मी कोण होणार,हे मलाच समजत  नाही
हसू नकोस तू अशी आई
सांग ना मला समजून काही
खूप शिकणार मोठ्ठा होणार
मनापासून अभ्यास करणार
मला माहिती आहे माझं बाळ
मोठ्ठा झाल्यावर किनई
"चांगला" माणूस नक्कीच होणार.
कवयित्री-ज्योती कपिले.
-----------------------------------------------------
 
३) "परी"
असेच एकदा तिला परीचे पंख सापडले
कुतुहलाने तिने ते हातात घेतले
आणि काय आश्चर्य,
ते पंख तिलाच  चिकटले,
कळत, नकळत
आता तीच झाली आहे एक परी
परीचे जीवन ,टी जगू लागली खरी
कुणाचे अश्रू पुसायचे,कुणाला हसवायचे
प्रत्येकाच्या जीवनात
फूलच फूलं फुलवायचे
आता मात्र तिला माझं
एकच सांगणं
तू झालीयेस खरी,एक परी
पण...
पण हे व्रत आता सोडू नकोस,
उतू नकोस मातू नकोस
घेतला वसा टाकू नकोस...
घेतला वसा टाकू नकोस...
ज्योती कपिले
------------------------------------


४) "बुद्धिबळ"
माझ्या बाल मित्रांनो,सांगते एक गंमत
ऐका तर खरं,तुम्हाला पण वाटेल जंमत
खेळायचा का आपण,बुध्दिबळाचा खेळ?
गाणं आणि खेळांचा झालाय सुंदर मेळ
चौसष्ट घर्म,अर्धी पांढरी,अर्धी काळी
तिकडे राहणारी,बघा कसा खेळ खेळी
अर्ध अर्ध राज्य,दोघा भावांची झाली वाटणी
बघूया कशी केली त्यांनी, आपापल्या सैन्याची आखणी
एक असतो राजा,त्याची एकच आहे राणी
राजा चालतो एकेक पाऊल
पण कितीही घरं चालू शकते राणी
तिरक्या चालीचे त्यांचे दोन उंट
कुरुवळत चालले दाढीचे खुंट
दोन्ही घोड्यांची तऱ्हाच आहे न्यारी
अडीच पावलांची त्यांची दौडत चाले स्वारी
दोन हत्ती पण नाही अंबारी नाही झूल
सरळ किंवा आडवे चालतात,त्यांना पडत नाही भूल
सैन्यात
मात्र आहे त्यांच्या आठ आठ शिपाई
शत्रूला आडवं पडण्याची त्यांना मोठी घाई
आधी स्वारी करण्याचा मान घेतात पांढरे
त्यांना सडेतोड उत्तर द्यायचा प्रयत्न करतात काळे
शांततेत विचार करा आखून नि रेखून
'बळा'बरोबर तुमच्या बुद्धीचा वापर करून
दोघेजण खेळतात असा बुद्धिबळाचा खेळ
जरा जपून बरका,नाहीतर 'चेकमेट'ची येईल वेळ.
-कवयित्री ज्योती कपिले

----------------------------------------------------------------------- 

४) ''तडम तडम तडतड ताशा''
विजेने कडाडून दिली वर्दी
काळ्या ढगांची जमली गर्दी
तडम तडम तडतड ताशा
वाजवत  आला पाऊस राजा
सरीवर सरी भिजली धरणी
मृद्गंध गेला गगनी
हिरवीगार डोंगरदरी
सुजलाम सुफलाम निसर्गराणी!
कवयित्री -ज्योती कपिले
--------------------------------------- 

 
५)"सण आणि महिने"
शाळेतल्या बाई आमच्या शिकवतात खूप सोपं
लक्षात ठेवायला अभ्यास,लावा म्हणतात थोडं डोकं
चैत्र महिन्यात गुढीपाडवा,नवे नवे संकल्प करा
वैशाख महिन्यात अक्षयतृतीया चांगला मुहूर्त आहे हे ध्यानी धरा
जेष्ठ महिन्यात वटपौर्णिमा,सत्यवान सावित्रीची आठवण करा
आषाढ महिन्यात व्यास पौर्णिमा,गुरुजनांचा आदर करा
श्रावण महिन्यात राखी पोर्णिमा बहीण-भावांचा सण हा खरा
भाद्रपद महिन्यात गौरी-गणपती,आनंदाला येते भरती
आश्विन महिन्यात दसरा दिवाळी,गोड धोड ,फराळ ,रांगोळी
कार्तिक महिन्यात त्रिपुरी पौर्णिमा,चमचम  चांदण्या पाण्यात उतरल्या
मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती,भक्तजन पारायण करती
पौष महिन्यात मकर संक्रांत,तिळगुळ घ्या आणि गोड बोला
माघ महिन्यात महाशिवरात्री,शिव शंकराला बेलफुल वाहती
फाल्गुन महिन्यात होळी,खायला मिळते पुरणपोळी!
अशी आहे सण आणि महिने लक्षात ठेवायची खूण
तोंडपाठ सुध्दा  झाले माझे,दाखवू का परत म्हणून? 
कवयित्री -ज्योती कपिले
---------------------------------------------------------------

6 ) ऋतू आणि महिने
 एका वर्षात येतात ऋतू सहा
कुठल्या कुठल्या महिन्यात ते पहा
चैत्र आणि वैशाखात
वसंत ऋतू ऐन बहरात
जेष्ठ आणि आषाढात
ग्रीष्मऋतूच्या उन्हाचा त्रास
श्रावण आणि भाद्रपदात
वर्षाऋतू  भिजवतो जनामनास
आश्विन आणि कार्तिकात
शरदऋतू फुलतो टिपूर चांदण्यात
मार्गशीर्ष आणि पौषात
हेमंतऋतूच्या थंडीचा सहवास
माघ आणि फाल्गुनात
शिशिरऋतूची पानगळ करते उदास
ऋतू आणि महिन्यांचे हे  येणे-जाणे
हृदयात उमलते जणू जीवनगाणे
------------------------------------
ज्योती कपिले

7) महती
कॉम्प्युटरची
लिहा,वाचा,तुम्ही खूप खूप शिका
आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घ्या
ऑफिस घर वा कारखाना
'कॉम्प्युटर' शिवाय कुठही पान हालेना
'एम.एस.ऑफिस' तर आलेच पाहिजे फस्ट!
काळाबरोबर चालणे आहे मस्ट!
'मल्टीमिडीया' म्हणजे जादुई  नगरीच म्हणाना
एकाच वेळी मिले ज्ञान आणि मनोरंजनाचा खजाना
'इंटरनेट'वर साईट सर्फिंग करावे
अवघ्या घडामोडी,जग घर बसल्या बघावे
चुटकी सरशी तुमची पत्रं 'इ-मेल'ने जातात
'चट'मुले तुम्ही ऑनलाईन' बोलतात
'इ-कॉमर्स,मेडिकल' प्रत्येक क्षेत्रात होते प्रगती
वेळही वाचतो अन पटकन मिळते माहिती
'हार्डवेअर',' साफ्टवेअर'शिका तुम्ही काहीही
पण शिकल्याशिवाय '
कॉम्प्युटर'  आता तरी पर्याय नाही.
--------------------------------------------------
ज्योती कपिले